अरे बापरे! आता भीती कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची

। मुंबई । प्रतिनिधी ।
गेले दोन वर्षे कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्र राज्यातील सर्व निर्बंध 1 एप्रिलपासून हटवण्यात आले. मास्कचीदेखील सक्ती नसल्याचे सरकारने जाहीरपणे सांगितले. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. एक्सई नावाचा करोनाचा नवा व्हेरियंट हा ओमायक्रॉनच्या बीए-2 सब-व्हेरियंटपेक्षा दहा टक्के जास्त संक्रमणक्षम असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटले आहे.

आत्तापर्यंत, ओमायक्रॉनचा बीए-2 सब-व्हेरियंट हा सामान्य संसर्गजन्य प्रकार मानला जात होता. बीए-2 हा अनेक देशांमध्ये पसरला असून युकेमध्ये नवीन रुग्ण याच व्हेरियंटमुळे वाढले आहेत. परंतु नवीन एक्सई हा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या बीए-1 आणि बीए-2 या दोन प्रकारातून म्युटेट होऊन तयार झाल्याचं म्हटले जात आहे. एक्सइ रीकॉम्बिनंट हा व्हेरियंट सर्वात आधी 19 जानेवारी रोजी यूकेमध्ये आढळून आला. तेव्हापासून या व्हेरियंटच्या 500 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली, असे आरोग्य संघटनेने या आठवड्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

Exit mobile version