। सुकेळी । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या ऐनघर जवळील अपघातासाठी धोकादायक असलेल्या खड्ड्याची वर्तमानपत्रात बातमी झळकताच महामार्गाचे काम करणारे ठेकेदार खडबडून जागे झाले. तात्काळ या ठेकेदाराकडून हा खड्डा भरण्यात आला. तसेच जिंदाल कंपनीच्या समोर असलेल्या गतिरोधकावर देखिल पांढर्या रंगाचे पट्टे मारण्यात आले.
महामार्गावरील ऐनघरजवळील श्री.समर्थ कृपा हॉटेलच्या समोरच एक महाभयंकर खड्डा बरेच दिवसांपासून पडला होता. या खड्ड्यामुळे वाहनांना अपघात होऊन अनेक जणांचे बळी गेले होत. तसेच वाहनांचे देखिल मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे वाहनचालकांना या खड्ड्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तसेच जिंदाल कंपनीच्या गेट समोरील गतिरोधकावर पांढर्या रंगाचे पट्टे नसल्यामुळे देखिल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत होते.
मात्र या खड्ड्याची तसेच गतिरोधकावर पांढर्या रंगाचे पट्टे नसल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकतात महामार्गाचे काम करणार्या संबंधित ठेकेदाराकडून हा धोकादायक खड्डा भरण्यात आला. तसेच गतिरोधकावर देखिल पांढर्या रंगाचे पट्टे मारण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.