शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये दोन पदकं
। पनवेल । वार्ताहर।
नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे पंजाबमधील पटियाला येथे ‘इंडिया ओपन शॉटगन चॅम्पियनशिप‘ या स्पर्धेचे शुक्रवारी (दि.16) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्व राज्यांतून शेकडो शॉटगन शूटर सहभागी झाले होते. या स्पर्धेत पनवेलची नेमबाज आर्या अभिजित पाटील हिने अटीतटीच्या सामन्यात दिमाखदार खेळाचे प्रदर्शन करुन रौप्य व कांस्य अशी दोन पदके पटकावली आहेत. तसेच, आर्याची राष्ट्रीय फेरीसाठी निवड झाली असून पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
आर्या पाटील ही जे.बी. कुसाळे रायफल शुटींग फाउंडेशनमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. तिला आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक तेजस कुसाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. शूटिंग स्पर्धेच्या थरारक फेरीत जे. बी. कुसाळे शूटिंग फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली असून त्यात अब्दुल हमीद मिरशिकारी यांनेही रौप्यपदक पटकावले आहे. आर्या पाटील व अब्दुल मिरशीकारी यांच्या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.