। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात दिवसाढवळ्या सरपंचाची हत्या करण्यात आली. दुसरीकडे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडी पोलीसांच्या अमानुष मारहाणीमुळे मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप न्यायधीशांच्या नावाची घोषणा झालेली नाही. राज्य सरकार ऐकत नाही, त्यामुळे अखेर राज्याचे घटनात्मक प्रमुख राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची सर्वपक्षीय पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय गुंतलेले आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा राज्यपालांनी घ्यावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी संभाजीराजे छत्रपती, खा. बजरंग सोनवणे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आ. जितेंद्र आव्हाड, आ. संदिप शिरसागर, भाजपा आ. सुरेश धस, शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे, स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव व उपाध्यक्ष अंकुश कदम उपस्थित होते.