। मुंबई । प्रतिनिधी ।
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. जितेंद्र आव्हाड, आ. संदीप क्षीरसागर, आ. प्रकाश सोळंके यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी सातत्याने आवाज उचलत आहेत. याच लोकप्रतिनिधींना गुंडांपासून जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी केली आहे.
शरद पवार यांनी सोशल मीडीयावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते.
बीड-परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणार्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमुळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत. असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन या लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी शरद पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.