शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
। ठाणे । प्रतिनिधी ।
सर्पदंश झालेल्या मुलाचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाल्याची घटना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. सरकारी अनास्थेमुळे प्रेम सदगीर (14) या मुलाला हकनाक जीव गमवावा लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथील प्रेम सदगीर हा मंगळवारी पाच वाजता मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. चेंडू लांब गेल्याने तो आणण्यासाठी गेला आसता त्याला विषारी सापाने दंश केला. दंश झाल्याचे लक्षात येताच लगेच त्याला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी केवळ रक्त तपासणी केली. मात्र, तज्ञ व माहीतीगार डॉक्टर नसल्याने केवळ रक्त तपासणीच्या आधारावर या 14 वर्षीय बालकावर एक तास कोणतेही उपचार न केल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने त्याच्यावर उपचार करावेत यासाठी पालकांनी डॉक्टर व परिचारिका यांना खूप विनंती केली. मात्र कोणीही मुलाकडे लक्ष दिले नाही. वॉर्ड सोडून डॉक्टर व कर्मचारी केबिनमध्ये गप्पा मारत बसले होते. प्रेमची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली. प्रशासनाने रुग्ण प्रेम सदगीर याला ठाणे येथे घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, त्याचदरम्यान त्याचा तडफडून मृत्यू झाला, असे मृत मुलाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.