लोकवर्गणीतून उभारलेली प्राथमिक शाळा तोडली
| अलिबाग | प्रतिनिधी |
लोकवर्गणीतून उभारलेली रेवदंडा येथील प्राथमिक शाळा सरपंचाने मनमानी कारभाराने तोडली. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट न करता, कोणतेही शासकीय परवानगी न घेता, कायदेशीर बाबीची पूर्तता न करता हा प्रकार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश गाडे यांनी केला आहे. ही बाब माहितीच्या अधिकारात उघड झाल्याचे समोर आले असून, सरपंच प्रफुल्ल मोरे यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निलेश गाडे यांच्या माहितीनुसार, आमदार महेंद्र दळवी यांचे समर्थक असलेले रेवदंडा येथील सरपंच प्रफुल्ल मोरे कोणालाही विश्वासात न घेता कारभार चालवत आहेत. रेवदंडा येथे लोकवर्गणीतून 1984 मध्ये प्राथमिक शाळा बांधली होती. या शाळेतून शिक्षण घेऊन हजारो विद्यार्थी घडले आहेत. या शाळेचे बांधकाम पूर्णतः पक्के होते.
तरीदेखील सरपंच प्रफुल्ल मोरे यांनी पदाचा गैरवापर करीत मार्च-एप्रिल 2024 मध्ये या शाळेची इमारत तोडली. चौकशीअंती बांधकाम तोडण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केले नसल्याचे समोर आले आहे. बेकायदेशीररित्या ही इमारत तोडली असल्याचा आरोप गाडे यांनी केला आहे. शाळेची इमारत तोडण्यासाठी शासकीय खात्याकडून परवानगी घेतली नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. सरपंचाच्या या मनमानी कारभारामुळे नाराजीचे सूर उमटत आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.