जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
। पालघर । प्रतिनिधी ।
गेल्या सात महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने आशासेविका आणि गटप्रवर्तकांच्या संतापाचा स्फोट झाला आहे. पालघर जिल्ह्यातील तब्बल साडेतीन हजारांहून अधिक आशासेविकांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर उपासमार मोर्चा काढला. या मोर्चात गटप्रवर्तकही सहभागी झाले होते. साकारविरोधात गगनभेदी घोषणा देत हजारो आशासेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले.
आशासेविका व गटप्रवर्तक या आरोग्य सेवेच्या प्रमुख प्रवाहातील घटक आहेत. या सर्वांचे चरितार्थ त्यांना मिळणार्या मानधनातून चालत आहे. त्यांना नोव्हेंबरपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी उपासमार मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मानधन न मिळाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गटप्रवर्तक व आशासेविकांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्या, नोव्हेंबर 2024 पासून ते चालू महिन्यापर्यंत रखडलेले मानधन अदा करा, 2025 पासून राज्य शासनाच्या नियमानुसार मोबदला द्या, आदी मागण्या यावेळी मोर्चेकर्यांनी केल्या. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशासेविका कर्मचारी संघाचे सरचिटणीस भगवान दवणे यांनी केले.
सात महिने झाले अजूनही आम्हाला आमचे मानधन मिळाले नाही. आमची उपासमारी होत आहे. आम्ही आमच्या मुलाबाळांना खायला द्यायचे काय आणि कुटुंब चालवायचे कसे, त्यामुळे आम्हाला उपासमार मोर्चा काढावा लागत आहे.
– रेखा रणदे, आशासेविका