यंदाही खडड्यातूनच करावा लागणार प्रवास
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण स्थितीत आहे. त्यातच शनिवार व रविवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे यंदाही अलिबाग-रोहा मार्गावरील नागरिकांचा प्रवास खडड्यातूनच होणार आहे.
अलिबागपासून साईपर्यंत 82 किलोमीटरच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण यादृष्टीने टप्प्या-टप्प्याने रस्त्याचे काम केले जात आहे. अलिबाग ते सुडकोली मार्गावरील रस्त्यावर डांबरीकरण, रुंदीकरणाचे काम करण्यात आले. वेलवली-खानाव ते उसरपर्यंतच्या रस्त्याचे काम अपूर्ण स्थितीत आहे.
रविवारी पडलेल्या अवकाळी पावसात या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण केली जात आहे. रस्त्याची साईडपट्टी खराब झाली आहे. वेलवली खानाव, उसर, वावे, फणसापूर, चिंचोटी अशा अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता खचून गेला आहे. या खड्ड्यातून प्रवास करणे धोकादायक होऊ लागले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरत असल्याने प्रवासी व चालकवर्गाकडून नाराजीचे सूर उमटत आहेत. रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होऊ लागला आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत. जीव मुठीत घेऊन चालकांना वाहन चालविण्याची वेळ आली आहे.
रस्त्याचे काम सुरु असल्याने यंदा पावसाळ्यात खड्डयातून प्रवास होणार नाही, अशी आशा प्रवाशांना होती. मात्र, ही आशा खोटी ठरल्याचे दिसून आले आहे. वेलवली खानाव, उसर, वावे या ठिकाणी रस्त्याचे काम न केल्याने हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.
साईडपट्टी खचली
अलिबाग-वावे मार्गावरील बामणगाव ते वढावपर्यंतच्या रस्त्याची साईडपट्टी अवकाळी पावसात खचून गेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोऱ्यांचे काम योग्य पद्धतीने न केल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसण्याची भीती निर्माण झाली आहे. अवजड वाहनांची या मार्गावर सतत वर्दळ असते. ही वाहतूक सुरू राहिल्याने हा रस्ता पूर्णतः खचून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.