उरणच्या रस्त्यावर मृत्यूचा सापळा

| उरण | प्रतिनिधी |

उरण नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. जलवाहिनीची दुरुस्ती झाली, कामही दिवाळीपूर्वी पूर्ण झाले; मात्र, त्यासाठी काँक्रीटचा रस्ता खोदून तयार केलेले खड्डे बुजविण्याचे सौजन्य नगरपालिकेला अद्याप सुचलेले नाही. दिवाळी उलटून गेली, तरी मुख्य रस्त्यावरील खड्डे जसेच्या तसे असल्याने वाहनचालक आणि नागरिकांच्या जीवाशी उघडपणे खेळ सुरू आहे. एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच नगरपालिका प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल उरणकरांकडून केला जात आहे.

उरण शहरातील उरण-मोरा मुख्य रस्त्यावर पेन्शनर पार्क येथून बोरी नाका आणि भवरा परिसराकडे जाणाऱ्या मार्गावरील जलवाहिनी नादुरुस्त झाली होती. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी नव्याने तयार केलेल्या काँक्रीटच्या रस्त्यावर खोदकाम करण्यात आले. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या वाहनचालकाचा जीव गेल्यानंतर नगरपालिका प्रशासन जागे होणार का? अपघात घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार स्वीकारणार का? की नेहमीप्रमाणे एकमेकांकडे बोट दाखवून हात झटकणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Exit mobile version