भातपीक क्षेत्रात घट

कडधान्ये, भाजीपाला, कलिंगडाचे पीक लागवडीवर भर

| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यात कालव्याच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात भातपीक घेतले जात होते. या भातपिकाच्या क्षेत्रात दरवर्षी घट होत चालली असून, यंदाचे वर्षी माणगाव तालुक्यात कालव्याच्या पाण्यावर 102 हेक्टरवर भातपिकाची लागवड केली आहे. त्यामुळे आगामी काळात माणगाव तालुका भातासाठी भुकेला राहणार आहे. या घटलेल्या भातशेतीमुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांना बाजारपेठेतील भातावर अवलंबून राहावे लागणार आहे. माणगावसह रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून प्रचलित होता. इथला स्थानिक शेतकरी कडधान्ये, भाजीपाला, कलिंगडाच्या नगदी पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला असून, त्याने या पिकातून दमदार पाऊल टाकले आहे.

डोलवहाळ बंधारा उभारणीपूर्वी या तालुक्यातील सुमारे दीडशे ते दोनशे गावांतील नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट मैलोन् मैल करावी लागत होती. खरीप हंगामानंतर शेतकर्‍यांना अन्य रोजगाराचे साधने नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील तरुण-तरुणी मुंबई येथे स्थलांतरीत होऊन चाकरी करीत होते. मात्र, डोलवहाळ बंधार्‍यामुळे शेकडो गावांच्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळाली असून, अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. तर, ही एक पिकी शेती दुपिकी झाली. यामुळे अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाला असून, दुपिकी शेतीलाही संजीविनी मिळाली आहे. त्यामुळे दुबार शेतीची माणगावच्या उत्पन्नात भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सक्षम होत आहे.

सह्याद्रीच्या कड्या कपारी मध्ये वसवलेल्या या तालुक्यात प्रामुख्याने कुणबी समाजाचे लोक पारंपरिक पद्धतीने पिढ्यान्पिढ्या शेती करत असत. सुमारे 300 ते 400 सें. मी. एवढे वार्षिक पर्जन्यमान असताना केवळ भाताचे एकच पिक घेतले जात असे. साहजिकच, फक्त भातपिकावर येथील शेतकरी कुटुंबाची गुजराण करीत होता. रोहा तालुक्यातील डोळ्वाहाळ येथे काळ प्रकल्प उभारल्यामुळे काळ प्रकल्पाचा शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. सन 1976 पासून प्रत्यक्ष सिंचनास सुरुवात झाली.

माणगाव तालुक्यातील 76 व रोहा तालुक्यातील 48 गावांना उन्हाळी हंगामासाठी सिंचनासाठी पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची शेती दुबार झाली होती. मात्र भातपिकावर निव्वळ अवलंबून न राहता नगदी पिकाकडे शेतकरी वळत आहे. तसेच कांही शेतकर्‍यांनी शेती करणे सोडून दिल्यामुळे भातपिकाच्या शेतीवर संक्रांत आली आहे.

असा होतो पाणीपुरवठा
काळ प्रकल्पांतर्गत कालव्याच्या लांबीचे क्षेत्र कुंडलिका उजवा तीर कालवा 288 किमी, कुंडलिका दावा तीर कालवा 10 किमी, रोहा शाखा 21 किमी, मोर्बा शाखा 33 किमी, माणगाव शाखा 32 किमी, गोरेगाव शाखा 12 किमी, अंबा कालवा अशा प्रकारे वेगवेगळ्या कालव्यांतून त्यांच्या वितरिका मार्फत अगदी शेत ते शेत पाणी पुरवठ्याचे सिंचित केले जात आहे.

नगदी पिकाचे क्षेत्र वाढले
माणगाव तालुक्यात दरवर्षी 2100 हेक्टर क्षेत्रावर भातशेती पिकवली जात होती. यंदाचे वर्षी या भातपिकाच्या क्षेत्रात घट झाली असून, 102 हेक्टरवर भातपीक शेतकरी घेत आहेत. भातपिकाचे क्षेत्र कमी झाले असून, कलिंगड क्षेत्र 125 हेक्टर, भाजीपाला क्षेत्र 883 हेक्टर, कडधान्ये 1591 हेक्टरवर पिकवले आहे. तर नगदी पिकाचे क्षेत्र 2599 हेक्टर झाले आहे. यावरून नगदी पिके घेण्याकडे शेतकरी मोठ्या प्रमणात कल दिसत आहे.

Exit mobile version