। नेरळ । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणार्या खुशबू ठाकरे या मुलीच्या मृत्यूची शासनाने चौकशी करून पालकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पोलीस मित्र संघटना सुरक्षा परिषद यांनी केली आहे. तसेच, संघटनेच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे आणि सहकारी यांनी कर्जतचे पोलीस अधिक्षक डी.डी. टेले यांना याबाबत निवेदन दिले आहे.
पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता चौथीत शिकणार्या खुशबू नामदेव ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटना घडली होती. कोणताही आजार नसलेल्या खुशबूला कुष्ठरोगी ठरवण्यात आले होते. याबाबत आरोग्य विभागाने मुलीच्या पालकांना कळविले नव्हते. चुकीची औषधे घेतल्याने मुलीच्या अंगावर फोड्या आल्या होत्या. तिचे हातपाय देखील सुजले होते. शेवटी 22 जानेवारी रोजी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान खुशबूचा मृत्यू झाला. याप्रकरणी शासकीय आदिवासी आश्रमशळा व आरोग्य विभाग दोषी असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस मित्र सुरक्षा परिषदेने पोलीस अधिक्षकांना केली आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश अध्यक्ष रतन लोंगले, रायगड जिल्हा युएव्ही अध्यषकः प्रफुल जाधव, कृष्णा पवार, तालुका अध्यक्ष शांताराम मिरकुटे, तालुका अध्यक्ष संतोष थोरवे आदी उपस्थित होते.