स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीचे संकट
। चिरनेर । प्रतिनिधी ।
विकासाच्या नावाखाली सातत्याने समुद्रीखाड्यांत टाकण्यात येत असलेल्या दगड-मातीचे वाढते भराव, सीआरझेडचे उल्लंघन, खारफुटी झाडांची होणारी बेसुमार कत्तल तसेच वाढत्या जलप्रदूषणामुळे उरण, पनवेल, नवी मुंबई परिसरातील समुद्रीखाड्या पार दुषित झाल्या आहेत. त्यामुळे माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या असून, याचा विपरीत परिणाम झाल्याने परिसरातील पारंपारिक मासेमारी पुरती धोक्यात आली आहे.
उरण परिसर आंतरभरतीसंबंधी मासेमारी क्षेत्रांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी किनारपट्टी आहे. मात्र, या सर्व किनारपट्टीवर उभारण्यात आलेल्या प्रकल्पांचा एकत्रित परिणाम गंभीरपणे जाणवू लागला आहे. जेएनपीए बंदर, जेएनपीए सेझ, शिवडी-न्हावा सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिलायन्स, सिडकोचे सेझ तसेच तळोजा एमआयडीसीतील प्रक्रिया न केलेले रासायनिक मिश्रित दुषित सांडपाणी थेट समुद्रीखाड्यांत सोडला जात आहे. त्यामुळे उरणसह नवी मुंबईतील खाड्या प्रदुषित झाल्या आहेत. तसेच, माझगाव डॉक न्हावायार्डच्या नवीन जेटीच्या भरावाने न्हावा गावातील शेकडो पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले आहे.
विकासाच्या नावाखाली होत असलेल्या भरावांमुळे समुद्र खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण होत आहे. हा गाळ समुद्राच्या आंतरभरतीच्या मासेमारी झोनमध्ये जमा होत आहे. परिणामी माशांचे प्रजनन, स्पॉनिंग ग्राऊंड आणि सागरी वनस्पती यामुळे पारंपारिक मासेमारी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहे. त्यामुळे मासे मिळण्याचे प्रमाणही कमालीचे घटले आहे. त्यामुळे पारंपारिक मासेमारी धोक्यात आली असून स्थानिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जेटीच्या भरामुळे गाळाची समस्या
माझगाव डॉकची न्हावा येथे उपशाखा असुन ती न्हावायार्ड या नावाने ओळखली जाते. या न्हावायार्डच्या नवीन जेटी उभारण्यासाठी भरावाचे काम नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाले आहे. या जेटीसाठी होत असलेल्या भरावामुळे न्हावा गावातील नारळी बंदर या विभागात मासळी पकडण्यासाठी बांधण्यात आलेले पारंपारिक दगडी बंधारे (कालवे) बुजून गेले आहेत. या कालव्यात विविध प्रकारची रुचकर मासळी मिळत होती. त्यावर येथील पारंपरिक मच्छीमारांची उपजीविका होत होती. परंतु, जेटीसाठी होत असलेल्या भरावामुळे येथे गाळाची समस्या निर्माण झाली आहे. या गाळामुळे भरतीचे पाणी कालव्यांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यात येणारी विविध प्रकारची मासळीही बंद झाली आहे. याबाबत स्थानिक मच्छीमारांनी माझगाव डॉकसह जिल्हाधिकारी व ग्रामपंचायतीला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
नवी मुंबई व घारापुरी बेट जवळपासच्या खाडींच्या प्रदूषण स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी डिसेंबर 2024 मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सर्व खाड्यांचे पाणी अत्यंत दूषित असल्याचे आढळून आले. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाद्वारे कोणतेही निरीक्षण किंवा ठोस पावले उचलली जात नाहीत. सीआरझेडचे उल्लंघन हे स्थानिक मच्छीमारांसाठी पारंपारिक मासेमारी क्षेत्रांचा आणि उपजीविकेच्या स्रोताचा नाश करण्यास जबाबदार ठरत आहेत. त्यामुळे या गंभीर समस्यांबाबत व वास्तविकतेकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.
नंदकुमार पवार,
अध्यक्ष, महाराष्ट्र लघु पारंपारिक मत्स्य कामगार संघटना