एकदरा खाडीत गाळाचे साम्राज्य
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर |
मुरुड समुद्रकिनारी 2016 साली एकदरा खाडीतील गाळ काढण्याचे काम फिशरीष विभागाने केले हाते. त्यावेळी 7 कोटी खर्च करून हा गाळ काढण्यात आला होता. तो गाळ काढून विश्रामधाम किनारी टाकण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा हा किनारा वाळूने भरला आहे. तसेच, मुरुडच्या खाडीत येण्याचे पात्र छोटे असल्याने माच्छीमारांना ओहोटीला किनारी येणे कठीण झाले आहे. आहोटीच्या वेळी त्यांना भरतीचे पाणी भरेपर्यंत 5 तास समुद्रातच ताटकळत राहावे लागते.
मुरुड-एकदरा परिसरात सुमारे 300 मासेमारीच्या बोटी आहेत. त्यांना पहाटे लवकर मासेमारीसाठी जायचे झाले आणि ओहोटी असेल तर त्यांना जाता येत नाही. त्यासाठी त्यांना रात्री आपली बोट खोरा बंदरात लावण्याची नामुष्की ओढावते. कारण बोटीतील इंधन, जाळी, 15 दिवसांचे खाद्य भरणे खोरा बंदरात कठीण होते. जर बोट घरासमोरील समुद्रात लावली असेल तर बोटीवर साहीत्य नेणे सोयीस्कर होते. त्यामुळे, येथील खडक कापून गाळ साफ करून मुरुडकडे येण्याचा मार्ग मोठा करावा. तसेच, समुद्रातील वाळू पुन्हा येऊ नये म्हणून ग्रॉइन बंधारा बांधावा, अशी मागणी स्थानिक मच्छीमारांनी केली आहे.
मुरुडच्या कोळी बांधवाना खोल समुद्रात जाण्या-येण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्याने अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. पूर्वी मासे चांगले मिळत असत; परंतु, हवामान बदलामुळे मासेमारीवर दुष्काळ ओढावत आहे. त्यात वाळू गाळामुळे बोटी अडकतात आणि कोळी बांधवाचे मोठे नुकसान होत आहे. सर्वप्रथम ग्रॉइन बंधारा बांधने गरजेचे आहे. शासनाने मासेमारीच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मनोहर बैले,
मच्छीमार