माथेरानमधील प्रवाशांची मागणी; विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी उपाय
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान येथे जाणार्या पर्यटकांसाठी शासनाच्या परिवहन विभागाची मिनी बस चालविली जाते. या मिनीबससाठी माथेरान येथील दस्तुरी नाका येथे कोणत्याही प्रकारचा अधिकृत थांबा नाही. त्यामुळे थांबा अभावी प्रवासी यांची गैरसोय होत असून, उन्हाळ्यात- पावसाळ्यात उभे राहता यावे यासाठी परिवहन विभागाने निवारा शेड उभी करावी अशी मागणी माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी केली आहे.
माथेरान या पर्यटन स्थळासाठी परिवहन विभागाच्या कर्जत आगार यांच्या कडून 2007 मध्ये बससेवा सुरू झाली. सुरुवातीला लाल रंगाच्या गाड्या कर्जत -नेरळ- माथेरान अशी प्रवासी सेवा गाडी देत होती. त्यानंतर 2013 मध्ये मिनी बस आल्या आणि त्यांच्या माध्यमातून प्रवासी सेवा दिली जात आहे. कर्जत येथून माथेरान हे अंतर अवघ्या 25 रुपयात ही सेवा मिनीबस देत आहे. त्यामुळे माथेरान शहरातील महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले आहेत. दररोज सकाळी माथेरान येथून निघणारी गाडी विद्यार्थ्यांनी भरलेली असते. नेरळ -कर्जत तसेच खोपोली आणि बदलापूर उल्हासनगर अशा महाविद्यालयात जावून हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नेरळ आणि कर्जत येथे उतरून विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात जाण्यासाठी उपनगरीय लोकल यांचा सहारा घेत असतात.
माथेरान हे ठिकाण सर्वाधिक पर्जन्यमान असलेले ठिकाण असून त्या ठिकाणी पाच हजार हून अधिक मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. अशा पावसाच्या ठिकाणी मिनीबस थांबत असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची निवारा शेडची व्यवस्था शासनाने केलेली नाही. त्याचवेळी तेथे मिनीबस थांबा हा देखील अधिकृत करण्यात आलेला नाही. त्यामुळे पर्यटक प्रवासी यांना मिनीबसचा प्रवासी थांबा शोधावा लागतो. त्याचवेळी घाट रस्ता असल्याने अनेकदा मिनीबस ही घाटातील वाहतूक कोंडीमुळे उशिरा देखील येत असते.
त्यावेळी प्रवासी यांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. त्यामुळे परिवहन विभागाने माथेरानसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असावी असे निवारा शेड दस्तुरी येथे बनवून अधिकृत थांबा यांची व्यवस्था करावी अशी मागणी माथेरान मधील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी केली आहे. गेल्या 15 वर्षात अशी व्यवस्था परिवहन विभागाने सर्वाधिक गर्दीची गाड्या चालणार्या मार्गावर प्रवाशांसाठी केलेली नाही याबद्दल पारटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.