। माथेरान । वार्ताहर ।
अपुर्या पार्किंग व्यवस्थेमुळे पर्यटकांना किंमती मोटार गाड्या कुठेतरी घाटात पार्क करून पायपीट करावी लागते एकंदरीत त्यांना सुरक्षित प्रवासाची, वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन अन्य ठिकाणांहून सहज उपलब्ध होणारे पर्यायी मार्ग तयार केल्याशिवाय गत्यंतर नाही. अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांमधून सातत्याने जोर धरू लागली आहे.
मागील काळात फिनिक्युलर रेल्वे सारख्या होऊ घातलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला तालुक्यातील जबाबदार लोकप्रतिनिधींनी केवळ मतांच्याच राजकारणापायी खोडा घालून विरोध केला होता. राज्य शासनाने सुंदर स्थळाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी जोपर्यंत पर्यायी व्यवस्था निर्माण करत नाही तोपर्यंत हे स्थळ पूर्वापार चालत आलेल्या जोखडात संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात माथेरानमध्ये स्थानिक पातळीवर सुध्दा विकासाला विरोध करणारी अशिक्षित मंडळी सुध्दा कार्यरत आहे. सुट्ट्यांच्या हंगामात घाटरस्त्यात गाड्यांच्या रांगा लागत असून मुलांना सामानसोबत पायी आणणे म्हणजे एकप्रकारे इथे आल्याची शिक्षा पर्यटकांना सहन करावी लागल्याची विदारक दृश्ये याठिकाणी पहावयास मिळतात. त्यामुळेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी यापुढेही पर्यायी मार्गास मतांच्या राजकारणापायी अप्रत्यक्षपणे हमखास विरोध करणार यात शंकाच नाही.त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन इथे पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
माथेरानला पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
