। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
लांजा शहरातून जाणार्या मुंबई-गोवा महामार्गाच्या उड्डाणपूलाखालून जाणार्या मार्गाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळावी, अशी मागणी लांजा शहर समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी (दि.20) लांजा तहसीलदार यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, लांजा शहरातून जाणार्या मुंबई-गोवा महामार्गाचे सध्या काम सुरू आहे. शहरातील कोर्ले तिठा ते साटवली रोड तिठा अशा अंतरासाठी सलोह संधानकातून खांब (आरसीसी पिलर) उभारून उडानपूल प्रस्तावित आहे. त्यानंतर साटवली रोड ते एसटी डेपो या अंतरासाठी मातीच्या भारावातून उड्डाणपुराचे बांधकाम प्रस्तावित आहे. या मातीच्या भरावातून जाणारा 540 मीटर अंतरासाठी उड्डाणपुलाखालून जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही मार्ग प्रास्तावित केलेला नाही.
या रस्त्याचे पूर्वेकडील भागात तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन, लांजा हायस्कूल व जुनियर कॉलेज, तालुका भूमी अभिलेख कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ कार्यालय इत्यादी अनेक कार्यालये कार्यरत आहेत. तर, रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजूला आरडीसी बँक, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती कार्यालय, स्टेट बँक, सारस्वत बँक, तालुका मराठी शाळा, शॉपिंग सेंटर आदी शासकीय, निमशासकीय कार्यालयांचा समावेश आहे.
यामुळे या पुलाखालून जाणार्या मार्गासाठी आपण जातीने लक्ष घालून विशेष बाब म्हणून त्या प्रस्तावास मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रसन्न शेट्ये, प्रकाश लांजेकर, सुधाकर कांबळे, सचिव चंद्रशेखर स्वामी, निरंजन देशमुख, जयवंत शेट्ये, महंम्मद रखांगी, विजय कुरूप, विठोबा लांजेकर, अभिजीत जेधे, प्रभाकर शेट्ये, राजेश राणे, विजय सोलगावकर, पांडुरंग जाधव, देवदत्त शेट्ये, सचिन लिंगायत, महेश सप्रे, मंदार भिंगार्डे आदी उपस्थित होते.