। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावर गुरुवारपासून विशेष जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती. यामुळे पर्यटकांनी मुंबई-गोवा महामार्गाला फाटा देत रेल्वेने प्रवास करणे पसंत केले. यामुळे महामार्गावर फारशी गर्दी दिसून आली नाही.
सलग शासकीय सुट्या लागल्या की, मुंबई-पुण्यातील पर्यटक नेहमी कोकण आणि गोव्याकडे धावत असतात. यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नेहमी वाहनांची गर्दी पाहायला मिळते. मुंबई-पुण्यातील अनेक वाहने सीएनजीवर चालतात. यातच महामार्गावर सीएनजी पंप कमी आहेत. सीएनजी संपला की, वाहनांना दीर्घकाळ सीएनजी पंपावर वाट पाहत उभे राहावे लागते. त्यात निम्मा वेळ वाया जातो. यामुळे काही पर्यटकांनी या वेळी व रेल्वेला पसंती दिली आहे.
गुरुवारी स्वातंत्र्यदिनाची तर शनिवार-रविवार शासकीय सुट्टी असल्यामुळे शुक्रवारची नियमित सुट्टी टाकून चार दिवस आनंद घेण्यासाठी अनेकजण सहकुटुंब घराबाहेर पडले होते. यावेळी पर्यटकांनी मुंबई-गोवा महामार्गाने न जाता रेल्वेने प्रवास करण्यासला पसंदी दिली. मध्यरेल्वेने यावेळी कोकण रेल्वेमार्गावर तब्बल 18 विशेष गाड्यांची सोय केली होती. यामुळे रेल्वेने पर्यटनस्थळ गाठणे पर्यटकांना सोयीचे झाले होते. यावेळी कोकण रेल्वेमार्गावर धावणार्या सर्वच रेल्वे प्रवाशांनी भरलेल्या दिसून आल्या. रेल्वेस्थानकांवरही प्रवाशांची गर्दी दिसून आली.