। जेद्दा । वृत्तसंस्था ।
दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघातून बाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमारने आपल्या अनुभवाच्या जोरावर इंडियन प्रीमियर लीगमधील संघांना लिलावाच्या दुसर्या दिवशी आकर्षित करण्यात यश मिळवले. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने त्याला 10 कोटी 75 लाख रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. भुवनेश्वरसह भारतीय वेगवान गोलंदाजांसाठी मोठी मागणी पाहायला मिळाली.
गेल्या काही काळापासून दुखापतींचा सामना करत असलेल्या दीपक चहरला मुंबई इंडियन्सने नऊ कोटी 25 लाख रुपयांना आपल्या संघात घेतले. कसोटी संघातील राखीव खेळाडू मुकेश कुमारसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने आरटीएमफ कार्डचा वापर करत 8 कोटी रुपये खर्च केले. आकाश दीपला लखनऊ सुपर जायंट्सने 8 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. भुवनेश्वरने आतापर्यंत 287 टी-20 सामन्यांत 300 बळी मिळवले. त्याने भारताकडून अखेरचा सामना नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. मात्र, आयपीएलमध्ये त्याला कामगिरीत सातत्य राखण्यात यश आले आहे. मुंबईकर वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला राजस्थान रॉयल्सने तब्बल 6 कोटी 50 लाख रुपयांना संघात सहभागी करून घेतले. माजी संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान यांच्यात तुषारसाठी बरीच चढाओढ पाहायला मिळाली. अखेर राजस्थानने बाजी मारली.