पर्यटन हंगामास सुरवात; पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ
| नेरळ । वार्ताहर ।
माथेरान पर्यटनस्थळी येणारे पर्यटक यांच्यासाठी महत्वाची असलेली मिनीट्रेनमध्ये वाढ करण्याची मागणी करणारे निवेदन माथेरान नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत आणि विवेक चौधरी यांच्या वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांना देण्यात आले. माथेरान येथे कुटुंबासह लालवानी यांची सावंत आणि चौधरी यांनी भेट घेत मिनीट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ गाडीच्या फेर्यांमध्ये वाढ करावी आणि अमन लॉज शटल सेवेच्या फेर्यांमध्ये तसेच प्रवासी डब्ब्यांमध्ये वाढ करण्याची मागणी निवेदन देऊन केली.
माथेरानचा पर्यटन हंगामास सुरवात होणार असून पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होत असते. प्रत्येक पर्यटकाला माथेरान नेरळ मिनीट्रेनमधून प्रवास करता यावी अशी इच्छा असते. बर्याच पर्यटकांना प्रवासी डब्ब्यांची संख्या कमी असल्यामुळे शटल सेवेचा लाभ घेता येत नाही. त्याकरिता शटल सेवा ही आठ डब्यांची करण्यात यावी. तसेच शनिवार-रविवार प्रमाणे सोमवार ते शुक्रवार शटल सेवेच्या कमीतकमी दहा अप आणि दहा डाऊन अशा सेवा चालविल्या जाव्यात, अशी मागणी करण्यात आली. त्याचवेळी नेरळ येथून माथेरानसाठी संध्याकाळी 5 वा तसेच माथेरानवरून नेरळसाठी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यानची ट्रेन तात्काळ चालू करण्याचे आदेश संबधीत विभागाला देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक लालवानी यांच्याकडे देण्यात आले. तर वाहनतळ आणि दस्तूरी नाका येथे मिनी ट्रेन वेळापत्रकाचे इंडिकेटर लावण्यात यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.