खोपोली नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
वावोशी | वार्ताहर |
खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 मधील काजुवाडी परिसरात नगरपालिका प्रशासनाने कोणतीच विकासकामे न केल्याने येथील नागरिकांना रस्ता, वीज, शौचालय, गटारे अशा मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत.
काजुवाडी हा विभाग 300 हून अधिक घरे असलेला खोपोली नगरपालिका हद्दीतील उंच सखल भागात वसलेला परिसर असून, नागरिकांना वर-खाली जाण्या-येण्यासाठी योग्य रस्ता न बनवल्याने कसरत करावी लागते. ही एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, अशी येथील विदारक परिस्थिती आहे. तसेच या ठिकाणी येथील लोकसंख्येच्या मानाने मोठ्या शौचालयाची आवश्यकता असतानाही या ठिकाणी दोनच शौचालय असून, तिथे जाण्यासाठीही रुंद रस्ता नाही. तसेच शौचालयाची टाकी फुटली असून, तिथेही रोगराईसदृश्य परिस्थिती आहे. या विभागात कचरा गोळा करण्यासाठी देखील कचरा पेटीची व्यवस्था खोपोली नगरपालिका प्रशासनाने केली नसल्याने सर्व कचरा रस्त्याच्या बाजूला उघड्यावरच पडून राहत असल्याने नागरिकांना या कचर्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. अशा अनेक समस्यांनी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.