बालविवाहाविरोधात जनजागृतीचा निर्धार

पालक-युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर संपन्न

| कर्जत | प्रतिनिधी |

समाजामध्ये बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अश्वपरीस फाऊंडेशन, खोपोली यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अलिबाग, कर्जत, खालापूर पोलीस स्टेशन व चौक पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोंडेवाडी, कर्जत खालापूर येथे मार्गदर्शन व समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास पालक, युवक-युवती तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आजही अपुऱ्या शिक्षणामुळे व सामाजिक जागरूकतेच्या अभावामुळे अनेक ठिकाणी बालविवाहाची प्रकरणे घडताना दिसतात. अशा घटनांमुळे कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची नोंद होऊन संबंधित कुटुंबांना आर्थिक, शारीरिक तसेच मानसिक अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः आदिवासी समाजात अशा घटना टाळण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे मत अश्वपरीस फाऊंडेशनच्या अध्यक्षा इशिका शेलार यांनी व्यक्त केले. समाजामध्ये बालविवाह रोखण्यासाठी आणि नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमा दरम्यान बालहक्क आणि त्यासंबंधित कायदे याबाबत उदाहरणांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बालविवाहाचे सामाजिक व आरोग्यविषयक दुष्परिणाम, त्याविरोधातील कायदेशीर तरतुदी तसेच अशा प्रकरणांमध्ये नोंद होणाऱ्या गुन्ह्यांबाबत माहिती देऊन उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. याशिवाय महिलांवर होणारे अत्याचार, न्यायालयीन प्रक्रिया तसेच महिलांना उपलब्ध असलेल्या संरक्षणाच्या कायदेशीर उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. आदिवासी बांधवांच्या विविध सामाजिक समस्याही यावेळी ऐकून घेण्यात आल्या. कागदोपत्री प्रक्रियेमध्ये येणारे अडथळे, न्याय मिळण्यात होणारा विलंब तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी यावरही चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमात चाईल्ड हेल्पलाईन, अत्याचारग्रस्त महिलांनी मदतीसाठी कुठे संपर्क साधावा, बेरोजगारीचे सामाजिक परिणाम, शिक्षणाचे महत्त्व आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी योग्य माहिती व मार्गदर्शन देण्यात आले. निराधार स्त्रिया व मुली यांच्या शिक्षण व देखरेखीबाबत प्रेरणा बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास खालापूर पोलीस स्टेशन व चौक पोलीस स्टेशन यांचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरणात पार पडला.या शिबिरात अश्वपरीस फाऊंडेशनच्या अध्यक्षा इशिका शेलार, महिला व बाल विकास सेवा विभाग प्रमुख प्रकाश पवार, सहाय्यक अभय केंद्र संरक्षण अधिकारी मिथुन लक्ष्मण गुंजाळ, ज्येष्ठ समाजसेविका बेबी साळवी तसेच प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आशा जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. खालापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार तसेच इतर पोलिस अधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. या शिबिराच्या आयोजनासाठी अनिल जाधव, श्याम वाघमारे आणि राकेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version