रस्त्याचे वळण कमी करण्यासाठी पुलाचे नियोजन; वर्षभरापासून पूल तयार, रस्ता जोडण्याचे काम अपूर्ण
| नेरळ | प्रतिनिधी |
शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्ग 548 अ रस्त्यात कळंब गावाजवळ नवीन पूल बांधण्यात आला आहे. या पुलाला जोडणारा रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी बनविला नाही. त्यामुळे पूल तयार होऊन वर्ष लोटले तरी रस्ता आणि पूल जोडण्याचे काम झालेले नाही. दरम्यान, कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील वळण कमी करण्यासाठी बनवलेल्या पुलाची जोडणी लवकरात लवकर करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
समृद्धी महामार्ग रस्त्याला जोडून आजूबाजूला जाणाऱ्या महानगर आणि शहरे यांच्यासाठी नवीन राष्ट्रीय महामार्ग बनविले जात आहेत. त्यात धर्तीवरच शहापूर येथे समृद्धी महामार्ग जेएनपीटीकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 548 अ बनविण्यात आला आहे. शहापूरपासून सुरू होणारा हा नवीन राष्ट्रीय महामार्ग मुरबाड-कर्जत-खोपोली आणि वाकण येथे हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यांना जोडला जातो. त्यामुळे हा रस्ता आरसीसी काँक्रिटचा बनविला आहे. या रस्त्यावर राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून नवीन पूल बांधण्यात आले आहेत. तसे पूल कर्जत तालुक्यात बांधले गेले आहेत. तसा नवीन पूल कळंब येथे वळणावर बनविला आहे. या रस्त्याने सतत अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे काही वळणावर या अवजड वाहनांची वाहतूक करताना अनेक अडचणी येत असतात. त्यात कळंब येथील त्या वळणावर रस्तादेखील खराब झाला असून, त्याचा परिणाम वाहने अडखळत प्रवास करीत असतात. अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी कर्जत तालुक्यात कळंब याच ठिकाणी वाहने अडखळत प्रवास करीत असतात.
त्यामुळे कळंब येथे बांधण्यात आलेला नवीन पुलाच्या दोन्ही बाजू जोडून पूल वाहतुकीस खुला करण्याची मागणी केली जात आहे. कळंब येथे वळणावर असलेला हा रस्ता स्थानिक शेतकऱ्यांच्या जागेमधून जात असल्याने त्यांच्या जमिनीचा प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी करीत आहेत. कळंब येथील वळणावर राष्ट्रीय महामार्ग नवीन पुलास जोडला गेल्यास प्रामुख्याने अवजड वाहनांची वाहतूक सुखकर होऊ शकते.