कृषी संशोधन केंद्राकडू ग्रामपंचायतीची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील हालिवली गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोकण कृषी विद्यापीठाचे कर्जत भात संशोधन केंद्र उभे आहे. त्यामुळे या भात केंद्राकडून वापरात नसलेल्या रस्त्याच्या कडेची जमीन हालिवली गावातील तरुणांना रोजगार व्यवसायसाठी भाडेतत्त्वावर देण्याची मागणी हालिवली ग्रामपंचायतीने ठराव घेऊन केली आहे. या मागणीचे निवेदन हालिवली ग्रामपंचायतच्या सरपंच प्रमिला बोराडे यांनी भात संशोधन केंद्राला दिले आहे.
कोकण कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्रासाठी हालिवली गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत. त्या जमिनीपैकी असंख्य जमीन ही आजही ओसाड असून प्रामुख्याने कर्जत कल्याण राज्यमार्ग आणि शहापूर मुरबाड कर्जत खोपोली राष्ट्रीय महामार्ग या भात संशोधन केंद्राच्या बाजूने जात आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापार उदीम असून हलवली गावातील तरुणांनी गेल्या काही वर्षात या रस्त्याच्या एका बाजूला लहान दुकाने थाटून व्यवसाय सुरु ठेवला होता. मात्र त्या दुकानांमुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आणि ती दुकाने अतिक्रमण करून बांधली असल्याचे कारण पुढे करून तोडण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक स्थानिक तरुण बेरोजगार झाले आहेत. ही बाब स्थानिक तरुणांनी हालिवली ग्रामपंचायतीकडे मांडली होती. त्यामुळे ग्रामपंचायत मधील सर्व सदस्यांनी ठराव घेऊन रस्त्याच्या कडेला भात संशोधन केंद्र वापर करीत नसलेली जमीन केंद्राने स्थानिक तरुणांना भाडेतत्वावर द्यावी असा ठराव घेण्यात आला.
या ठरावाची प्रत हालिवली ग्रामपंचायतचे सरपंच प्रमिला सुरेश बोराडे यांनी कृषी संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांची भात केंद्रात जाऊन भेट घेतली आणि स्थानिकांच्या मागणीचे निवेदन दिले. सोबत ग्रामपंचायतीने घेतलेला ठरावदेखील भात केंद्राला दिला असून, रस्त्याच्या कडेची जमीन केंद्राने स्थानिकांना व्यवसाय करण्यासाठी द्यावी, अशी आग्रही मागणी सरपंच प्रमिला बोराडे यांनी केली आहे.