आरोग्य यंत्रणा सज्ज; गावागावातील फिरुन नागरिकांची जनजागृती
| अलिबाग | प्रतिनिधी |
देशभरात क्षयरोग दुरीकरण व आणि जनजागृती कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. क्षयरोग मुक्त अभियानासाठी रायगड जिल्ह्याची प्रायोगिक तत्त्वावर राज्यात निवड करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून क्षयरोग जनजागर सुुरू करण्यात आला असून, गावात जाऊन नागरिकांची तपासणी करणे, वेगवेगळे उपक्रम राबविणे, प्रभात फेरी काढून जनजागृती केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्षयरोग मुक्त भारत या संकल्पनेतून संपूर्ण देशात क्षयरोग दुरीकरण आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून जिल्ह्यात जनजागृती सुरु केली आहे. क्षयरोग मुक्त पंचायत हा उपक्रम क्षयरोग विभागामार्फत सुरु केला आहे. अलिबाग तालुक्यातील काविर ग्रामपंचायत व बेलोशी ग्रामपंचायतीमध्ये मंगळवार (29 ऑगस्ट) रोजी विद्यार्थीची तपासणी, रांगोळी स्पर्धा बचतगटासाठी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र म्हात्रे, ग्रामसेविका प्रज्योता नांदगावकर, ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळीस क्षयरोग तपासणीसाठी 100 टक्के योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
बेलोशी गावात जाऊन तेथील ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा भोपी, सदस्यांशी भेट घेऊन क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. निक्लेेशा म्हात्रे, परिचारिका अरूणा भगत, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गणेश बालके, आरोग्य सहाय्यक जयवंत विशे, नरेंद्र तांडेल वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक किर्तीकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील, बेलोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद भोईर व ग्रामस्थ उपस्थित होते.
75 ग्रामपंचायतींची क्षयमुक्तीसाठी निवड
रायगड जिल्ह्यातील 75 ग्रामपंचायती क्षयमुक्त करण्यासाठी निवड केली असून, या ग्रामपंचायतींमध्ये काम सुरु केले आहे. जिल्ह्यातून क्षयमुक्तीसाठी क्षयरोग विभाग सज्ज झाला आहे. गावांसह वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन लहान मुलांसह ग्रामस्थ, महिलांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रुग्णांवर वेळेवर उपचार करणे. पेशंट सपोर्ट ग्रुप तयार करणे, वेगवेगळ्या सामाजिक संस्थादेखील यासाठी काम करीत असल्याची माहिती क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन जाधव यांनी दिली.