महिला बालकल्याण विभागाकडून खारघर, पनवेल येथे वसतिगृह
|रायगड | प्रतिनिधी |
घटस्फोटित, एकल, नोकरी करणाऱ्या, शिक्षण घेणाऱ्या आणि पीडित असणाऱ्या महिलांना संरक्षण देण्याबरोबर आसरा आणि आधार देण्यासाठी जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. विशेष करून नोकरदार महिलांसाठी रायगड जिल्ह्यात वसतिगृहांची उभारणी केली आहे. खारघर आणि पनवेल येथे वसतिगृह सुरु असून, तब्बल 175 महिला सुरक्षा रक्षकांच्या भरवशावर या सुविधेचा लाभ घेत आहेत. नियम आणि निकषात असणाऱ्या महिलांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जातो.
अविवाहित, विधवा, घटस्फोटीत कुटुंबापासून वेगळ्या राहणाऱ्या विवाहित महिला की जिचा पती किंवा नजीकचे कुटुंब त्याच भागात राहात नाही अशा महिलेस वसतिगृहात प्रवेश देण्यात येतो. ज्या महिलेचे उत्पन्न 25 हजारांपेक्षा पेक्षा जास्त नसेल अशी महिला तिच्या मुलासह वसतिगृहात राहू शकते. तसेच नोकरी मिळविण्यासाठी प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांनाही या वसतिगृहामध्ये प्रवेश देण्यात येतो. अशा प्रकराची वसतिगृह रायगड जिल्ह्यात खारघर सेक्टर 11 आणि पनवेल रेल्वे स्थानक येथे जिल्हा महिला बालकल्याण विभागाने उभारली आहेत.
खारघर येथे असणाऱ्या वसतिगृहात 102 महिलांची तर पनवेल येथील वसतिगृहात 100 महिलांच्या राहण्याची व्यवस्था कार्नाय्त आली आहे. या वसतिगृहात राहण्यासाठी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या 30 टक्के महिलांना प्रवेश दिला जातो. तर नोकरीला असणाऱ्या 70 टक्के महिलांना प्रवेश दिला जातो. सद्यस्थितीत या दोन वसतिगृहांमध्ये 175 महिला सुरक्षित राहत आहेत. या वसतिगृहांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे येथे असणारे सर्व कर्मचारी महिला वर्गातीलच नियुक्त करण्यात येतात. यामुळे महिला अधिक सुरक्षित असल्याचा अनुभव घेतात. असे जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी विनीत म्हात्रे यांनी सांगितले.
नोकरीला असणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह उभारण्याबरोबर संपूर्ण कोकणातील मतिमंद असणाऱ्या महिलांना आधार मिळावा यासाठी रायगड जिल्ह्यात कृपा महिला वसतिगृह उभारण्यात आले आहे. या वसतिगृहांमध्ये निराधार मतिमंद महिलांवर मानसिक आजारावर उपचार केले जातात. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात पाठविण्यात येते. आजमितीला कृपा महिला वसतिगृहामध्ये 55 महिलांना आसरा देण्यात आला आहे.
विनीत म्हात्रे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी