कामोठेमधील मैदान विकसित करा

शेकापचे पालिकेला निवेदन


| पनवेल | वार्ताहर |

कामोठे शहरात काही ठराविक मैदाने सर्वांसाठी खुली आहेत, त्यात प्रामुख्याने सेक्टर 8 मधील मैदानदेखील येते. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आजमितीस हे मैदान ओसाड झाले आहे. सदर मैदान विकसित करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहे. ते पुढे म्हणाले की, या मैदानात जागोजागी मोठे दगड, उंच, सखल भाग, वाढलेले जंगली गवत त्यामुळे येथे मुले खेळण्यास टाळाटाळ करतात. त्यातच मैदानासमोरील बारमधील मद्यपींच्या रात्रं-दिवस मैफिली जमत आहेत. सदर मैदान शहराच्या मध्यभागी असल्याने येथे साफसफाई केल्यास मुलांना खेळण्यासाठी चांगले मैदान मिळेल तसेच डासांची उत्पत्ती कमी होईल, त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवाशांनादेखील दिलासा मिळेल.

मैदानाअभावी मुले टीव्ही, मोबाईल यांच्यात व्यस्त झाली आहेत. त्यांना काहीअंशी लगाम होईल. तरी पनवेल महानगरपालिकेने बालमनांचा सहानुभूतीने विचार करावा आणि सदर मैदान लवकरात लवकर विकसित करून मुलांना खेळण्यासाठी हक्काची जागा मिळवून द्यावी, अशी मागणी श्री शितोळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version