विकासकामे पूर्ण करावीत; माथेरानकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी विकासकामे पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माथेरानकरांच्या वतीने माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदेंनी आ. महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत दि.19 रोजी मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात समक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.

माथेरान हे एक छोटेसे पर्यटनस्थळ असून मागील काळात याठिकाणी फिनिक्युलर रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी मनोज खेडकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात प्रयत्न केले होते परंतु काही स्वार्थी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतांच्या हव्यासापोटी या प्रकल्पास विरोध केला होता, त्यामुळे जिल्ह्यातील हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प थांबला गेला होता. तो पुन्हा एकदा सुरू होऊन इथे एक पर्यायी व्यवस्था निर्माण व्हावी जेणेकरून मुंबईच्या पर्यटकांना अगदी जवळचे पर्यटनस्थळ म्हणून इथे येण्यास वाव मिळू शकतो.

त्याचप्रमाणे ऐन सुट्टयांच्या हंगामात मुख्य प्रवेशद्वार असणार्‍या दस्तुरी नाक्यावर अपुर्‍या पार्किंग सेवेमुळे पर्यटकांना आपली खासगी वाहने पार्किंग करता येत नाहीत.त्यामुळे जागेअभावी पर्यटक माघारी जात असतात. त्यासाठी याच भागातील रिक्त असणार्‍या एमपी प्लॉट क्रमांक 93 हा नगरपरिषदेच्या ताब्यात मिळावा. तसेच मा सुप्रीम कोर्टात सुरू असणार्‍या क्ले ब्लॉक बाबतच्या केस मध्ये एम एम.आर.डी.ए. च्या संबंधीत अधिकार्‍यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून घेण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Exit mobile version