रोहा बस स्थानकाची दुरवस्था; प्रवाशांचे हाल बेहाल!

भर उन्हाळ्यात पंखे गायब, सांडपाण्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त; प्रशासनाविरोधात संतापाची लाट

| चणेरा | प्रतिनिधी |

तालुक्याचे प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहा बस स्थानकाचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यभर उन्हाचा पारा चाळीशीच्या पुढे गेला असताना रोहा बस स्थानकात प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे उकाड्याने हैराण झालेले प्रवासी तर दुसरीकडे अस्वच्छता, दुर्गंधी आणि गैरसोयींमुळे संतप्त झाल्याचे चित्र आहे.

बस स्थानकातील प्रवासी प्रतीक्षागृहात बसविण्यात आलेल्या पंख्यांपैकी तब्बल दोन पंखे गायब असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी नवीन पंख्यांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने कडक उन्हात प्रवाशांना घामाच्या धारांमध्ये बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. हे पंखे चोरीला गेले की नादुरुस्त झाल्याने काढून टाकण्यात आले, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे बस स्थानक परिसरात सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने घाण पाणी उघड्यावर वाहत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून डास, माशा आणि विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. ”स्वच्छ भारत, सुंदर भारत”च्या घोषणा केवळ फलकांपुरत्याच मर्यादित राहिल्या असून प्रत्यक्षात बस स्थानकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

रोहा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने दररोज हजारो प्रवासी या बस स्थानकातून प्रवास करतात. मात्र, त्यांना अपेक्षित सुविधा मिळण्याऐवजी विविध गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शौचालय परिसरातून येणारी दुर्गंधी, फेरीवाल्यांचा वाढता वावर, सर्वत्र साचलेली घाण, अस्वच्छ वातावरण तसेच रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय बस स्थानकातील दूरध्वनी सेवा दीर्घकाळापासून बंद असल्याची तक्रार आहे. तिकीट आरक्षण खिडकीवर दुपारच्या वेळेत संबंधित कर्मचारी अनुपस्थित राहत असल्याने प्रवाशांना माहिती व आरक्षणासाठी ताटकळत उभे राहावे लागते. काही प्रवाशांनी तर एका नियंत्रकाकडून ड्युटीदरम्यान मद्यधुंद अवस्थेत काम केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच अनेक एसटी गाड्या निर्धारित वेळेपेक्षा तब्बल एक-एक तास उशिरा येत असल्याने प्रवाशांचा संताप आणखी वाढत आहे. या सर्व प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या संदर्भात आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा मोबाईल फोन वारंवार ”नॉट रिचेबल” लागत असल्याने त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

सामाजिक कार्यकर्ते नारायण खुळे यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले की, ”प्रवाशांकडून विविध कर आणि तिकिटांच्या माध्यमातून महसूल गोळा केला जातो. मात्र, मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. गायब झालेल्या पंख्यांच्या जागी तात्काळ नवीन पंखे बसवावेत, सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, बस स्थानकाची स्वच्छता राखावी आणि प्रवाशांच्या सुविधांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. रोहा बस स्थानकातील वाढत्या समस्यांमुळे प्रवाशांचा संयम आता सुटत चालला आहे. त्यामुळे एसटी महामंडळ आणि संबंधित प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे तातडीने लक्ष देणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून प्रवाशांना दिलासा मिळणार की केवळ आश्वासनांचीच मालिका सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version