बोर्लीपंचतन ग्रामस्थांची गैरसोय
| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या कोंढे पंचतन धरणातील पाणीसाठा संपल्यावर गावाला कार्ले धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु, या योजनेतील जलवाहिन्या सुद्धा जागोजागी फुटल्यामुळे त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायतीचे प्रशासक किशोर नागे ग्रामपंचायत,अधिकारी शंकर मयेकर हे रात्रंदिवस जातीने उपस्थित राहून जागोजागी फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने करून घेत आहेत. जुन्या आणि जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांमुळे वारंवार हे काम वाढतच असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बोर्ली पंचतन गावाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यामध्ये पाण्याची समस्या अधिकच गंभीर होऊ शकते. यासाठी गावाला कायम सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी एका मोठ्या पाणीपुरवठा योजनेची आवश्यकता आहे. त्याबाबत आत्तापासूनच विचार होणे गरजेचे आहे. अशी मागणी बोर्ली पंचतन ग्रामस्थांकडून होत आहे.
वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्यांमुळे त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असून, पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांची गैरसोय होते. गावासाठी मंजूर झालेल्या जलजीवन मिशनचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे.
-कुणाल पेडणेकर,
ग्रामस्थ बोर्लीपंचतन.
जुन्या झालेल्या जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने त्याच्या दुरुस्तीचा मोठा आर्थिक भार ग्रामपंचायतीवर पडत आहे. वारंवार फुटणाऱ्या जल वाहिन्यांमुळे ग्रामस्थांची गैरसोय होते त्यामुळे या जुन्या जलवाहिन्या बदलणे गरजेचे आहे. जलजीवन मिशनच्या कामाचा पाठपुरावा चालू असून, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी मी व ग्रामपंचायत अधिकारी शंकर मयेकर प्रयत्नशील आहोत.
-किशोर नागे,
प्रशासक ग्रामपंचायत बोर्लीपंचतन.
