विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका
। उरण । वार्ताहर ।
कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. यात शाळेचा पायाच ढासळू लागल्याने शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. तरी या शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही ना याची खातरजमा करावी, अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे.
काप्रोलीतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ब्रिटीश सरकारच्या काळात या ठिकाणी दगडी शाळेच्या इमारतीची उभारणी केली होती. मात्र, सुसज्ज अशा दगडी शाळेच्या इमारतीचे बांधकाम पाडून सर्व शिक्षण अभियान व आँल काँर्गो ग्लोबल लाँ.पा. या प्रकल्पाच्या अंतर्गत सुमारे 45 लाख 63 हजार रुपये खर्च करून प्राथमिक शाळेची इमारत नव्याने उभी करण्यात आली होती. मात्र, निकुष्ठ दर्जाच्या कामामुळे या इमारतीच्या स्लँबला गळती लागली असून प्लॅस्टर गळू लागले आहे. यावर उपाय म्हणून पुन्हा लाखो रुपये खर्च करून शाळेच्या इमारतीवर पत्र्यांची छेड बांधण्यात आली आहे.
मात्र, शिक्षण विभागाच्या ‘आंधळं दळतंय आणि कुत्र पिट खातंय’ या म्हणीप्रमाणे सध्या इमारतीचा पाया, भिंती जीर्ण झाल्या असून पडण्याच्या स्थितीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेची इमारत पडली तर शाळेत अभ्यासाचे धडे गिरविणार्या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती रहिवासी व्यक्त करत आहेत. तरी या शाळेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
माझ्याकडे शाळेच्या इमारतीसंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. शाळेचे बांधकाम जीर्ण झाले आहे. दुरुस्तीसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
– प्रियांका पाटील, प्र. गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती, उरण