शाळांची जीर्णवस्था शैक्षणिक गुणवत्तेच्या मूळावर

जिल्ह्यातील 310 प्राथमिक शाळा जीर्ण

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण लागल्याचे चित्र समोर आहे. आता त्यात शाळांची डागडुजी आणि शाळांच्या जीर्ण अवस्थेचा प्रश्न शैक्षणिक गुणवत्तेच्या मुळावर आला आहे. शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. आता पहिली घटक चाचणी परीक्षा सुरु होणार आहेत, असे असताना जिल्ह्यातील 310 प्राथमिक शाळा आणि 537 वर्ग खोल्या जीर्ण झाल्या आहेत. या जीर्ण झालेल्या शाळांची नव्याने उभारणी करणायची गरज शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाला कळविली आहे. शाळांची आणि वर्ग खोल्यांची नव्याने उभारणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला तब्बल 76 कोटी 66 लक्ष रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे. जीर्ण झालेल्या शाळांची तातडीने उभारणी करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन विभागाला सादर केला आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार 566 शाळा आहेत. या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण देण्याचे कार्य नित्यनेमाने केले जाते. या शाळांपैकी 455 शाळांची आणि 803 वर्ग खोल्यांची डागडुजीचे प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यात 310 शाळा जीर्ण झाल्या असल्याचे शिक्षण विभागाच्या दप्तरी नोंद झाली आहे. काही शाळांमधील 537 वर्गखोल्या देखील जीर्ण झाल्याने या वर्गांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवण्याचे काम शिक्षक जिकरीने करताना दिसत आहेत. जीर्ण झालेल्या शाळांमध्ये अलिबाग 23, कर्जत 38, खालापूर 21, महाड 41, माणगाव 38, म्हसळा 15, मुरूड 18, पनवेल 6, पेण 32, पोलादपूर 11, रोहा 26, श्रीवर्धन 11, सुधागड 12, तळा 15, उरण 3 शाळांचा समावेश आहे. शाळांमधील वर्ग खोल्या जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्याची अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 537 वर्गखोल्या जीर्ण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये अलिबाग 42, कर्जत 67, खालापूर 32, महाड 77, माणगाव 46, म्हसळा 24, मुरूड 38, पनवेल 17, पेण 54, पोलादपूर 21, रोहा 45, श्रीवर्धन 21, सुधागड 19, तळा 31 आणि उरण 3 वर्गखोल्यांचा समावेश आहे.

प्राथमिक शाळांची आणि वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यासाठी 20 कोटी 82 लाख 64 हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जीर्ण झालेल्या शाळांची नव्याने निर्मिती करण्यासाठी लागणार निधी मिळविण्याचे दिव्य जिल्हा परिषदेला पार करावे लागणार आहे. शाळांच्या उभारणीसाठीचा निधी जिल्हा नियोजन विभागामार्फत प्राप्त होत असतो. यामुळे या शाळांची नव्याने उभारणी करण्यासाठी जिल्हा नियोजनाच्या निधीवर अवलंबून राहावे लागणार आहे. 310 शाळा आणि 537 वर्गखोल्या उभारण्यासाठी 76 कोटी 66 लाख रुपयांचा निधीची गाज भासणार आहे. यामध्ये अलिबाग 6 कोटी 18 लाख, कर्जत 9 कोटी 80 लाख, खालापूर 4 कोटी 80 लाख, महाड 11 कोटी 16 लाख, माणगाव 7 कोटी 71 लाख, म्हसळा 3 कोटी 67 लाख, मुरूड 5 कोटी 34 लाख, पनवेल 2 कोटी 10 लाख, पेण 6 कोटी 10 लाख, पोलादपूर 2 कोटी 31 लाख, रोहा 6 कोटी 72 लाख, श्रीवर्धन 3 कोटी 7 लाख, सुधागड 2 कोटी 87 लाख, तळा 4 कोटी 38 लाख आणि उरण तालुक्याला 45 लाख रुपयांची गरज भासणार आहे.

Exit mobile version