नागरिकांचे आरोग्य धोक्यात; लोकनेत्यांचा सिडको प्रशासनाला जाब
| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
कामोठे वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळावाटे अत्यंत गढूळ आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशा प्रकारे अशुद्ध पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येची दखल घेत स्थानिक नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत आणि नगरसेवक विकास घरत यांनी आक्रमक भूमिका घेत सिडको प्रशासनाकडे थेट जाब विचारला आहे. तसेच, कामोठे कॉलनी फोरमच्यावतीने देखील सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता चहारे यांना निवेदन देण्यात आले.
कामोठे येथील विविध सेक्टरमधील घरांमध्ये नळाला येत असलेले पाणी पिण्यायोग्य तर दूरच, पण इतर घरगुती वापरासाठीही अयोग्य असल्याचे चित्र आहे. बादलीत साठवलेले पाणी स्पष्टपणे पिवळसर आणि गढूळ दिसत आहे. त्यामुळे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, जुलाब आणि उलट्या यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत. पाण्याच्या या भीषण समस्येवर स्थानिक नेत्यांसह कामोठे कॉलनी फोरमने तात्काळ पावले उचलली आहेत.
स्थानिक नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत आणि नगरसेवक विकास घरत यांनी थेट सिडकोच्या संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. कामोठे वसाहतीला होणारा हा गढूळ पाणीपुरवठा नेमका कुठून आणि का होत आहे, याचा शोध घेऊन तो त्वरित थांबवण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. सिडको अधिकाऱ्यांनीही या समस्येची गंभीर दखल घेत लवकरात लवकर योग्य ती दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, कामोठे कॉलनी फोरमने सिडको प्रशासनाकडे पाणीपुरवठा यंत्रणेची तात्काळ तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच, विविध सेक्टरमधील सोसायट्यांमधून पाण्याचे नमुने घेऊन ते मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याशिवाय, कामोठे शहराला सिडकोकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना टँकरवर मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शहरासाठी पाणीपुरवठ्याचे प्रमाण वाढविण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. यावेळी महिला अध्यक्षा जयश्री झा, सचिव बापू साळुंखे, अर्पिता वाणी, शीतल पाटील, सुनील आडे, संतोष नायर, मनोहर पवार तसेच शहरातील विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाणी बिल भरूनही नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नसेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणताही तडजोडीचा खेळ खपवून घेतला जाणार नाही. दूषित पाणीपुरवठ्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करून नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. अन्यथा कामोठेतील नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल.
मंगेश आढाव,
अध्यक्ष, कामोठे कॉलनी फोरम
भोकर पाडा येथील जल शुद्धीकरण केंद्र येथूनच आशा प्रकारचं पाणी येत असून, या बाबत संबंधित विभागाला माहिती देण्यात आली आहे तसेच पाण्याचे सॅम्पल टेस्टिंग साठी पाठवण्यात आलेले आहेत.नागरिकांनी देखील पाणी उकळून प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रफुल देवरे,
अधिकारी, पाणी पुरवठा विभाग.







