पालीकरांची खासदारांकडून निराशा

वर्षभरापासून पाणीप्रश्न जैसे थे

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत पाली शहराचे वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न सुटतील या आशेने जमलेल्या नागरिकांची मंगळवारी घोर निराशा झाली. खासदारांच्या अचानक अनुपस्थितीमुळे मंगळवारी (दि. 18) आढावा बैठक आ. अनिकेत तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामुळे नाराज झालेल्या काही पालीकरांनी केवळ पोकळ आश्वासने नको, तर प्रत्यक्ष ठोस कृती करा, असे लोकप्रतिनिधींना सांगून पाली-सुधागड संघर्ष समिती पदाधिकारी, सदस्य यांनी सभात्याग केला.

या बैठकीत पालीचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न, पाणी फिल्टर योजना, बाह्यवळण रस्ता आणि इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही धूळ खात पडलेले उपजिल्हा रुग्णालय या विषयांवर विस्तृत चर्चा झाली. मात्र, मागील वर्षी खा. तटकरे यांनी आठ दिवसांत पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष उलटूनही स्थिती जैसे थे असल्याने उपस्थितांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. लोकप्रतिनिधींकडून केवळ आढावा बैठकांचा फार्स सुरू असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यावर सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती उपसभापती संदेश शेवाळे यांनी सांगितले की, दिल्लीत तातडीची आणि महत्त्वाची बैठक असल्याने खासदार सुनील तटकरे यांना अचानक जावे लागले. त्यांच्याच सूचनेनुसार आ. अनिकेत तटकरे आढावा घेण्यासाठी उपस्थित राहिले असून पालीकरांच्या प्रत्येक समस्येवर सकारात्मक चर्चा झाली आहे आणि हे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील.

दुसरीकडे, पाली-सुधागड संघर्ष समिती अध्यक्ष व स्थानिक नागरिक कपिल पाटील यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, पालीचे पाणी, रुग्णालय आणि रस्त्याचे प्रश्न वर्षानुवर्षे फक्त कागदावर आणि बैठकांमध्येच अडकले आहेत. बैठकीला खासदार उपस्थित राहून ठोस निर्णय देतील अशी नागरिकांना अपेक्षा होती, पण पुन्हा एकदा आमची निराशाच झाली. आता आम्हाला आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष पाणी आणि आरोग्य सुविधांची कालमर्यादा ठरवून कामाची पूर्तता हवी आहे.

Exit mobile version