जीवघेण्या खड्ड्यामुळे प्रवासी चिंतेत
। दिघी । वार्ताहर ।
बोर्लीपंचतन ते दिघी-पुणे महामार्गाला जोडलेल्या रस्त्याला शिस्ते गावाजवळ मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, वाहतूक धोकादायक बनली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन या मध्यवर्ती ठिकाणाहून शहरांकडे जाण्यासाठी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र, याच मार्गावर शिस्ते गावाजवळ रस्त्याच्या मध्यभागी खड्डा पडल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे साकव असल्याने वरील रस्ता खचून भगदाड पडले आहे. दरवर्षी पावसाळी याठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे येथे साकव घालण्यात आले. मात्र, पाण्याचा योग्य वाटेने निचरा होण्यासाठी आजही प्रयत्न केले जात नाही. या वर्षात तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 14 कोटी निधी वापरण्यात आला. यामध्ये या मार्गाचादेखील समावेश आहे. मात्र, वर्षभरातच येथील रस्ते खचले आहेत.
बांधकाम विभागाची चालढकल मागील पंधरवड्यापूर्वी या रस्त्याला भगदाड पडले आहे. या दिवसात पाऊसदेखील थांबला होता. मात्र, बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीचे थोडेही सौजन्य न दाखवल्याने आज प्रवाशांना गंभीर परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे.
पावसाळ्यात दुरुस्तीला अडथळा येत असून, लवकरच दुरुस्ती करण्यात येईल.
तुषार लुंगे, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन