गणेशोत्सवात महामार्गावर अवजड वाहनांचे विघ्न

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पाली मार्गे वळवली

। पाली । वार्ताहर ।

अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पुरता दुरवस्था झाली आहे. धीम्या गतीने सुरु असलेले महामार्गाचे काम हे नागरिकांना व वाहनचालकांना डोके दुखी बनली आहे. यावर उपाय योजना म्हणून या मार्गावरील वाहतुक पालीमार्गे वळवण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुक कोंडीसह अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी महामार्गाचा पाच वेळा पाहणी दौरा केला. गणपती सणापूर्वी पलस्पे ते इंदापूर दरम्यानची एकेरी मार्गिका पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र गणपती सण तोंडावर आला तरी काही ठिकाणची परिस्थिती जैसे थे! राज्य शासनाकडून यावर भन्नाट तोडगा काढण्यात आला असून, गणपती सणात मुंबई-गोवा महामार्गावरून वाहतूक कोंडी होऊ नये व तात्पुरत्या स्वरूपात बनविण्यात आलेला रस्ता गणपतीत टिकावा यासाठी एक महिना अगोदर मुंबई-गोवा महामार्गावरची अवजड वाहतूक गणपती सणापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आले. कोकणाच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक वाकण नाक्यावरून पालीमार्गे खोपोलीकडे वळविण्यात आली आहेत. परंतु याचा परिणाम पाली-खोपोली महामार्गाच्या वाहतुकीवर होत असलेला बघायला मिळत आहे.

पाली-खोपोली-वाकण या राज्य महामार्गाचे काम जरी पूर्ण झाले असले तरी काही ठिकाणी रस्ता हा निमुळता आहे. वाकण ते पाली, पेडली ते परळी, शेमडी ते मिरकूटवाडी या ठिकाणी डांबरीकरण असून तांत्रिक बाबींमुळे रस्त्याचे काम न झाल्याने रस्ता निमुळत्या स्वरूपाचा आहे. अशा ठिकाणी सध्या पाली मार्गे धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे मोठ मोठे मालवाहू कंटेनर, निमुळत्या रस्ता व नागमोडी वळणांमुळे पलटी होऊन वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. सध्या कोकणात जाण्यासाठी चाकरमानी पाली-खोपोली मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत.

पाली-खोपोली महामार्गावर परळी, पेडली सारख्या छोट्या बाजारपेठा असून त्याठिकाणी रस्ता देखील निमुळता आहे. त्यामुळे ऐन गणपती सणात पाली-खोपोली मार्गावरील अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागणार असल्याचे दिसून येत. पोलीस वाहतूक शाखेकडून देखील वाहतूक सुरळीत कशी होईल त्याकरिता कोणत्या उपाययोजना करण्यात येतील हे बघणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version