| नागोठणे | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी (दि.19) सकाळी अचानक भेट दिली. त्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सोयी सुविधांचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, पुरुष व स्त्री रुग्ण वॉर्ड, औषध विभाग, पॅथॉलॉजी लॅब तसेच आरोग्य केंद्राबाहेरील बाह्य परिसराची पाहणी करून त्याविषयीची सखोल माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट यांच्याकडून जाणून घेतली. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रवेशद्वार व त्यालगतची काही जागा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात संपादित होत आहे. तरी त्याचे मुल्यांकन अद्याप झालेले नाही. या जागेचा आर्थिक मोबदलाही मिळाला नसल्याचे जावळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वाय.एन. घोटकर यांच्याशी तात्काळ संपर्क साधून त्यांना यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.