| नेरळ | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्ग विकसित केला जात आहे. त्यातील पनवेल-कर्जत या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, अनेक ठिकाणी मार्गिका टाकण्यात येत आहे. तर, कर्जत सब अर्बन भागात चक्क नव्या मार्गिकेवर मालवाहू गाडी चालविली जात असल्याने हा मार्ग या वर्ष अखेरीस प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता असून प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
हार्बर मार्ग पनवेलपासून कर्जत असा नेवून नवीन मार्गाचे काम 2000 सालापासून सुरू आहे. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पनवेल-कर्जत मार्गावरील बोगद्यात साचणाऱ्या पाण्यामुळे या मार्गावर दोन नवीन मार्गिका टाकण्याच्या कामाला मंजुरी दिली होती. ट्रान्स हार्बर मार्गावरील या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे मुख्य मार्गावरील गाड्यांच्या संख्येवर होणारा परिणाम कमी होणार आहे. त्यात नवी मुंबईमध्ये झालेला विकास आणि नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ लक्षात घेऊन पनवेल-कर्जत मार्ग महत्वाचा ठरणार आहे. कर्जत-भिवपुरी रोड या दरम्यान कारशेड उभारले जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम जलदगतीने सुरू असून ट्रान्स हार्बर मार्गावरील महत्वाच्या मार्गावर टाकण्यात येत असलेल्या दोन मार्गिका टाकण्याचे काम तसेच्या मार्गावरील तिन्ही बोगद्याची कामे जवळपास पूर्ण होत आली आहे.