। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मंजूर झालेल्या संच मान्यतेची प्रत मिळवण्यासाठी शिक्षकांची अडवणूक केली जाते. शिक्षक मान्यतेसाठी पसे मागितले जातात हे पूर्णतः बंद झाले पाहिजे. पैसे घेण्याची प्रथा बंद करा काम उशिरा झाले तरी चालेल परंतु शिक्षकांनी कोणालाही पैसे देऊ नका जर कोणत्याही कार्यालयातून काम होत नसेल तर मला फोन करा मी सदैव आपल्या पाठीशी आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे, घाबरून जाऊ नका पसे घेण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करणार असल्याचे प्रतिपादन कोकण विभागाचे शिक्षक आ.बाळाराम पाटील यांनी केले आहे.
ते मुरुड तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उसरोली येथील आगरी समाज गृहात एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्यासमवेत शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत, माजी सरपंच अजित कासार, नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक चिंतामणी जोशी, चेअरमन सुधाकर दांडेकर, रमेश दिवेकर, वळके हायस्कूलचे चेअरमन मधुकर पाटील, उपसरपंच महेश पाटील आदी मान्यवर व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना आ.बाळाराम पाटील म्हणाले कि, राज्यात दीड लाख शिक्षक भरती प्रलंबित आहे. लवकरच शासनाकडून शिक्षक भरती सुरु होणार असल्याचे संकेत यावेळी त्यानीं दिले. तसेच रायगड जिल्ह्याला सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता लवकरच मिळणार असून यासाठी वित्त विभागाकडून विशेष तरतूद करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांची सर्व प्रलंबित कामे करणार असून कोणतीही चिंता न करण्याचे अभिवचन यावेळी शिक्षक आ.बाळाराम पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना दिले.