गर्भपात प्रकरणी डॉक्टरला अटक

महिलेच्या पतीवरदेखील गुन्हा दाखल

| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यातील बिरवाडी या छोट्याशा गावामध्ये क्लिनिक चालवत असलेल्या एका डॉक्टरने महिलेचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला महाड औद्योगिक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीवरदेखील गुन्हा दाखल केला आहे.

महाड औद्योगिक वसाहत क्षेत्रातील बिरवाडी गावामध्ये बीएएमएस पदवीधारक असलेल्या आणि एका शाळेच्या संचालकपदी काम करीत असलेल्या डॉ. राजेंद्र कुमार केंद्रे यांनी एका महिलेचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये सदर महिलेची प्रकृती खालावल्याने हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान, महिलेला पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून बिरवाडी येथील डॉक्टर केंद्रे यांच्या दवाखान्यात आणण्यात आले होते. याठिकाणी डॉक्टरने कायद्याने बंदी असतानादेखील गर्भपात करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे महिलेची प्रकृती अधिक खालावली.

महिलेची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर पुन्हा उपचार करण्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तळेगाव दाभाडे येथील पोलिसांनी सदर घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार गर्भपात करणार्‍या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आंधळे यांनी सदर डॉक्टर आणि त्याची पत्नी या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. ज्या डॉक्टरने हे कृत्य केले, तो बिरवाडीमध्ये एक शाळा चालवीत आहे. निरागस आणि निष्पाप मुलांना शिक्षण देणार्‍या डॉक्टरकडूनच गर्भपात केला गेल्याने या डॉक्टरविरोधात बिरवाडी पंचक्रोशी संताप व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version