श्रीकाळभैरवनाथ फाऊंडेशन संस्थेचा पुढाकार
| पोलादपूर | प्रतिनिधी |
सध्या पावसामुळे आणि साधन नसल्यामुळे वयस्कर ग्रामीण भागातील जनतेला तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात जाता येत नाही. त्यांचा आजार वाढू नये, यासाठी श्रीकाळभैरवनाथ फाऊंडेशन संस्थेने गावोगावी जाऊन औषधे व डॉक्टरांची सोय करून त्यांची मोफत तपासणी करून आवश्यक औषधे देण्याचे काम सुरू केले आहे. या उपक्रमाला ग्रामीण जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पोलादपूर तालुक्यात श्रीकाळभैरवनाथ फाऊंडेशन ही संस्था गेल्या आठ ते दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवत आहे. यंदापासून श्रीकाळभैरवनाथ फाउंडेशन संस्थेने पावसाळ्यात गावोगावी जाऊन डॉक्टर आपल्या दारी उपक्रम चालू करीत हा दरवर्षी चालू राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे.
यावर्षी श्रीकाळभैरवनाथ फाउंडेशनतर्फे भोगाव, कोंढवी, देवपूर, ओबळी,पैठण, चरई, वडाचा कोंड व इतर ठिकाणी जाऊन मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले. श्रीकाळभैरवनाथ फाऊंडेशनचे आधारस्तंभ किसनदादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरांचे आयोजन करण्यात आले. डॉ. दिव्या सोनवणे, डॉ. गुलाबराव सोनवणे व आशा सेविका स्मिता चिकणे यांचे मोलाचे सहकार्य झाले. श्रीकाळभैरवनाथ फाऊंडेशनचे संस्थापक विकास शिंदे, अजय कदम, सचिव रवींद्र मोरे, खजिनदार रामदास सुर्वे, विठ्ठल कदम, पोलादपूर तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र जाधव, श्रीकाळभैरवनाथ रेस्क्यू अध्यक्ष दीपक उतेकर, वैभव जाधव आदी उपस्थित होते.







