। नागोठणे । वार्ताहर ।
वरसे (ता. रोहा) येथील वरसे वैद्यकीय मित्र मंडळ आणि रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल अससोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोह्यातील काही डॉक्टर्स सहकार्यांकडून सामाजिक बांधिलकी जपून वारकरी तथा माऊली भक्तांसाठी शनिवार, दि. 2 जुलै व रविवार, दि. 3 जुलै रोजी फलटण येथे आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीर घेण्यात आले. रोहा तालुक्यातील वरसे वैद्यकीय मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम घेण्यात येतो. यावर्षीही हे आरोग्य शिबीर घेणार्या डॉक्टर सहकार्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
फलटण येथील या आरोग्य शिबिरात डॉ. अमित पाटील, डॉ. अतुल पाटील, डॉ. संकेत म्हात्रे, डॉ. रुपेश होडबे, डॉ. प्रथमेश बुधे, डॉ. मुकेश सिंग, डॉ. अभिजित जोशी आदी डॉक्टर्स सहभागी झाले होते. दरम्यान, या आरोग्य शिबिरासाठी डॉ. राजेंद्र धात्रक, डॉ. पुरूषोत्तम भोईर व इतर सहकारी डॉक्टर यांच्या वतीने औषधे देण्यात आली आहेत.