डॉक्टरांचा निषेध मोर्चा

| अलिबाग । प्रतिनिधी

कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.16) अलिबागेत निषेध मोर्चा काढण्यात आला. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. या मोर्चामध्ये वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.

कोलकाता येथील आरजीकल मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेचा पडसाद संपूर्ण देशभर उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय क्षेत्रात जोरदार आवाज उठविला जात आहे. शुक्रवारी येथील वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर घटनेच्या निषेधार्थ मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये काँग्रेसच्या नेत्या अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, नेहा गायकवाड, विजया साळुंखे, सीमा घोडेकर, विश्‍व हिंदू परिषद प्रखंड मंत्री मानस कुंटे, कुलदीप कोळी, शार्दूल लिमये, निनाद देव, स्वप्नील गाडे आदींसह वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शेतकरी भवन, बसस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूकमोर्चा काढण्यात आला. कोलकातातील महिला डॉक्टरच्या हत्येचा निषेध व्यक्त करणारे फलक प्रत्येक विद्यार्थ्याने हातात घेतले होते. त्यानंतर मोर्चातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, कोलकाता येथील आरजीकल वैद्यकीय महाविद्यालयामध्ये महिला डॉक्टरवर सामूहिक अत्याचार झालेला आहे. त्यानंतर पीडित महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. या महिलेवर अत्याचार करून तिला अतिशय क्रूरपणे मारलेले आहे. हे कृत्य करणार्‍यांना पकडून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार व हत्येचे गुन्हे दाखल व्हावेत. अशा नराधमांना फाशी होईल अशा पद्धतीने कलम त्यांच्यावर लावण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

याशिवाय महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात कार्यरत असणारे डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबतसुद्धा गांभिर्याने लक्ष देऊन त्यांनासुद्धा सुरक्षा मिळावी जेणेकरून अशी घटना घडण्यापासून थांबेल, अशी मागणीसुद्धा केली आहे.

Exit mobile version