सरकारी सवलतींचा गैरवापर करू नका

शरद पवारांचे शेतकर्‍यांना आवाहन

| सांगली | वार्ताहर |

क्षारयुक्त जमिनीसाठी राज्य सरकारने एक योजना आणली आहे. ते खर्चिक आहे, त्या खर्चाची जबाबदारी सरकार 80 टक्के घेते. अतिरिक्त पाणी हे बाहेर काढलंच पाहिजे. पाण्याची गरज आहे, पण अतिरिक्त होता कामा नये. आपल्याकडे नदीकाठ हा काळ्यामातीचा असतो. आपल्याकडे काही लोकांना सवय आहे की, एकदा मोटर चालू केली की परत चार दिवस तिकडे बघतही नाहीत. आता तर सरकारने मोफत वीज दिली आहे, आता मोटर कोण बंद करायला जाणार आहे का? सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका, असं आवाहन खासदार शरद पवार यांनी शेतकर्‍यांना केले. खासदार शरद पवार सोमवारी (दि.8) सांगली दौर्‍यावर होते. कवठेएकंद येथील एका संस्थेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी पवारांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

खा.शरद पवार म्हणाले, पिढीजात शेती करणारे आपण शेतकरी. एकेकाळी पाण्याची आपल्याकडे कमतरता होती. तेव्हा सांगलीत उपसा सिंचन योजना राबविण्यात आली. आपण या क्षेत्रात एकच पीक घेतलं, ते म्हणजे ऊसाच पीक. शेतीला सारख, सारख पाणी दिल्यामुळे आज नाहीतर उद्या त्या शेतीच नुकसान होतं. एकाच पिकाचे दुष्परिणाम आता आपण भोगत आहोत, असंही पवार म्हणाले. यावेळी शरद पवार यांनी स्वत:च्या शेतीचा अनुभव शेतकर्‍यांना सांगितला. माझी स्वत:ची 20 एकर शेती आहे. ती जमीन आधी क्षारयुक्त होती. त्यामुळे उत्पन्नाची खात्री नव्हती. त्यावेळी ती जमीन मी दुरुस्त करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आम्ही त्यावेळी जमिनीतील अतिरिक्त पाणी बाहेर काढलं, हे पाणी काढण्यासाठी आम्हाला 4 वर्षे लागली. आज या जमिनीत काही ठिकाणी ऊस, काही ठिकाणी पेरु, काही ठिकाणी चिकू अशी पिकं आहेत. आधी त्या शेतातील उत्पादन 20 टक्के होतं, आता त्याच शेतातील उत्पादन 65 टक्केच्या पुढं गेले आहे. फक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी जी पाऊलं टाकावी लागतात, ती टाकली म्हणून हे शक्य झालं, असंही पवार म्हणाले.

Exit mobile version