एक हजार दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ
| रायगड | खास प्रतिनिधी |
सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाने ‘दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात मंगळवार दि.29 रोजी जुने पनवेल येथील विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सुमारे एक हजार दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. याप्रसंगी दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य वाटप करण्यात येणार आहे. मेळाव्यास आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे उपस्थित राहणार असून, जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहून दिव्यांगासाठीच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
राज्य सरकारने दिव्यांग कल्याण व पुनर्वसनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची निर्मिती केलेली आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशान्वये ‘दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात अभियानांतर्गत मेळावा होत आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात दिव्यांगांना विविध प्रकारचे दाखल्यांचा लाभ मिळावा यासाठी 18 स्टॉल लावण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता व दिव्यांग व्यक्तींना शारीरिकदृष्ट्या सोयीचे व्हावे, यासाठी तालुकास्तरावर शिबिरे घेण्यात येणार आहेत. या शिबिरांमुळे दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांच्या लाभासाठी अत्यावश्यक असणारे उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, यूडीआयडी, दिव्यांग प्रमाणपत्र, मतदान कार्ड आदी दाखले विनासायस मिळणार आहेत. या अभियानांतर्गत आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सुरू असलेल्या सर्वेक्षणात लाभार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.