। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पाकिस्तान नेहमी भारताची बरोबरी करायला जातो आणि आपल्याशी स्पर्धा करण्याच्या नादात अनेकदा तोंडावर आपोटतो. असाच प्रकार चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतही पाहायला मिळाला. भारताकडून दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या हाती चीनचा झेंडा पाहायला मिळाला. यावेळी भारत-चीन लढतीत पाकिस्तानी खेळाडू चीनला सपोर्ट करत होते. पण, भारताने विजय मिळवून पाकिस्तानचा तिथेही पोपट केला. आणि आता तर पाकिस्तान हॉकी महासंघाने कमी मानधन जाहीर करून खेळाडूंची थट्टाच केली आहे.
पाकिस्तानने कांस्यपदकाच्या लढतीत कोरियावर विजय मिळवला. उपांत्य फेरीत यजमान चीनकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झालेल्या पाकिस्तान संघाने तिसर्या क्रमांकासाठीची लढत जिंकली. माजी विजेत्या पाकिस्तानने दक्षिण कोरियावर 5-2 असा दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानच्या शाहिद हनन व सुफियान खान यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर रुमानने एक गोल केला. कोरियाकडून ली जुंगजून व यांग जिहून यांनी प्रत्येकी एक गोल केला. पाकिस्तानने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत कांस्यपदक जिंकल्यानंतर पाकिस्तानी हॉकी फेडरेशनने खेळाडूंना रोख रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली. तारीक बुग्ती यांनी 100 डॉलर बक्षीस रक्कम प्रत्येक खेळाडूंना जाहीर केले. भारतीय रुपयात ही रक्कम 8 हजार 400 इतकी होते.