पेण | वार्ताहर |
अमली पदार्थ चोरी प्रकरणातील आरोपी मनसे विद्यार्थी सेनेचा सचिव निकेश पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 40 दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्याचे मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर त्यास पोलिसांसमोर शरणागती पत्कारावी लागली.
निकेश पाटील याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्या वकिलांकडून बचाव करण्यासाठी युक्तिवाद करण्यात आला; परंतु सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी गुन्ह्याची तीव्रता, अमली पदार्थाची चोरी व त्यामुळे तरुण पिढीवर होणारे परिणाम या बाबींचा तपशीलवार न्यायालयासमोर मांडला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी निकेश पाटील याला 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तक्रारीनुसार आठ प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्याचे बाजारमूल्य 1 लाख 23 हजार इतके आहे. हे आठ प्रकारचे अमली पदार्थ व्यायाम करणार्या तरुण पिढीला अतिशय घातक असल्याने निकेश पाटील यांनी हे अमली पदार्थ कोठून चोरुन आणलेत? या प्रकरणात कोण कोण आहे? याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. निकेश पाटील पोलिसांना तपासकामी किती सहकार्य करतोय, हे येणारा काळच ठरवेल.