। मुंबई । वृत्तसंस्था ।
केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबईच्या समुद्रात कार्डेलिया क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आले होते. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या व एक लाख 33 हजारांची रोकड जप्त करण्यात आले होते. या प्रकरणातील एका आरोपी तरुणीने सॅनिटरी नॅपकीनमध्ये लपवून ड्रग्स आणल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. नुपूर सारिका असे या तरूणीचे नाव आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नुपूर सारिका ही दिल्लीत फॅशन डिझायनिंगचे काम करते. तिला मोहकने ड्रग्ज दिले होते, जे तिने फार हुशारीने सॅनिटरी पॅडमध्ये लपवले होते. तसेच मोहक जसवाल या तरुणीने मुंबईतून एका स्थानिक व्यक्तीकडून ड्रग्स खरेदी केले होते. त्यानंतर तिने नुपूरला ते सॅनिटरी पॅड्समध्ये लपवण्यासाठी सांगितले होते.
याप्रकरणी, क्रूझमधून अभिनेता शाहरुख खानचा मुलगी आर्यनसह अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान अरबाज मर्चंटच्या बुटातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. तर इतरांनी लेन्स कव्हर, अंडरवेअरमध्ये ड्रग्स लपवले होते. तसेच मुलींनी सॅनिटरी पॅड्स, पर्सचे हँडल यात ड्रग्स लपवून ठेवले होते, अशी माहिती मिळत आहे.