समुद्र किनार्यावर 400 नौका परतल्या, ओल्या दुष्काळाची भीषण परिस्थिती
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
अति बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे आणि अवकाळी वादळी पावसाने समुद्र किनारपट्टीवर प्रचंड गारठा पडला आहे. रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत थंडीचा पारा 15 ते 10 सेल्सिअस इतका खाली येत असून मानवी प्रकृतीस सहन करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. अशा परिस्थितीत रक्त गोठून स्ट्रोक, हार्ट अटॅक,बीपी वाढणे किंवा कमी होणे, पक्षघात, मानसिक संतुलन बिघडणे अथवा अन्य कोणताही आजार अचानक निर्माण होऊन प्रकृती बिघडू शकते. यासाठी सायंकाळी शक्यतो बाहेर पडू नये किंवा उबदार कपडे घालूनच थंडीपासून बचाव करावा असे आवाहन सातत्याने केले जात आहे. या अतिथंडीचा परिणाम समुद्रातील मासळीवर देखील झाला असून मासळी मिळणे अत्यंत अवघड झाले आहे. यामुळे समुद्रात गेलेल्या मुरूड, एकदरा, राजपुरी, दिघी, नांदगाव या गावच्या सुमारे 400 मासेमारी नौका किनार्यावर परतल्या आहेत.
मासळीच्या ओल्या दुष्काळामुळे गेल्या गेल्या 15 दिवसांपासून मच्चीमारांवर नामुष्की ओढवली असून मच्चीमार तणावग्रस्त झाल्याची माहिती एकदरा येथील हनुमान सह. मच्चीमार सोसायटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर यांनी दिली. या बाबत शुक्रवारी सकाळी बोलताना एकदरा गावचे नौका मालक कैलास निशानदार, यांनी सांगितले की, समुद्रावरून अति थंड वारे वाहत असल्याने पाण्याला देखील मोठा थंडावा आला आहे. त्यामुळे मासळी देखील खोल पाण्यात तळाशी गेली आहे. समुद्रात पाणी अति थंड झाले की असेच होत असते.त्याचाच फटका मासळी मिळत नसल्याने शेकडो मच्छिमारांना बसला आहे. त्यामुळे मच्छिमारीच्या ऐन सिझनमध्ये मासेमारी अर्धवट सोडून आणि मोठे नुकसान सहन करीत आम्हाला किनार्यावर परतावे लागल्याचे कैलास निशानदार यांनी सांगितले.
सध्या कुपा, सुरमई आदी मासळी मिळत होती. परंतू आता सर्वच बंद पडले आहे. थोडी फार टायनी लाल कोलंबी मुरूड मार्केटमध्ये दिसून येत असते. 6 सिलेंडर्सवाली मोठी नौका सुमारे 500 लिटर्स डिझेल, बर्फ, खाद्य साहित्य आदी 70 ते80 हजार रुपये खर्चून मासेमारीस जात असते. अशा सुमारे अशा शेकडो नौका नुकसान सोसून अखेर किनार्यावर परतल्याचे शुक्रवारी दिसून आले. आता समुद्रात सन्नाटा दिसून येत आहे.विविध गावच्या किनार्यावर या नौका नांगरण्यात आल्या आहेत. समुद्रात पाण्याला अति थंडावा येतो त्यावेळेस मासळी किनार्यापासून खूप खोल समुद्रात ऊब मिळविण्यासाठी जात असते. अशा वेळी मासळीचा प्रवास 50 किंवा 100 वाव असू शकतो. पाकिस्तान बॉर्डर पर्यंत मोठी मासळी स्थलांतर करू शकते. त्यामुळे मासळी मिळणे अवघड असते. – मनोहर, बैल अध्यक्ष रायगड जिल्हा मच्छिमार कृती संघ







