| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील शिरवली गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेले रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने संपूर्ण गावात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल झाला असून ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हा रस्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच काम सुरू केल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. गावाच्या प्रवेशद्वारापासूनच चिखल साचल्यामुळे नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले असून कोणतेही वाहन गावात येण्यास तयार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर शिरवली ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. मात्र, गावातील मुख्य रस्त्याची ही दयनीय अवस्था नागरिकांसाठी मोठी गैरसोय ठरत आहे. तर काम करणाऱ्या ठेकेदाराने नियोजनाचा अभाव दाखविल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली आहे.
गेले दोन वर्षापासून मंजूर असलेला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता पावसाळ्यात सदर यंत्रणेने सुरू केला. सदर रस्ता पावसाळा अगोदर करणे फार गरजेचे आहे, असे ग्रामपंचायतीने अनेक वेळा तत्सम अधिकाऱ्यांना पत्र निवेदन देऊन सुद्धा पावसाळ्यामध्येच रस्ता खोदल्यामुळे ग्रामपंचायत व नागरिकास मोठ्या समस्यांना सामना करावा लागत आहे. औरंगाबादचा ठेकेदार व अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येते आहे.
महेश पाटील,
सरपंच शिरवली ग्रामपंचायत







